मुंबईतील विरार येथे एक धक्कादायक घटना घडली. ११ वर्षांपासून प्रेमसंबंधात असलेल्या तरुणाने संशयातून आपल्या प्रेयसीवर चाकूने हल्ला केला. डिसेंबर महिन्यात दोघांचे लग्न ठरले होते, मात्र त्याआधीच प्रियकराने धारदार शस्त्राने तिला गंभीर जखमी केले. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
गास कोपरी गावात राहणारा अक्षय जनार्दन पाटील आणि २३ वर्षीय भाविका भालचंद्र गावड यांचे गेल्या ११ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनी डिसेंबरमध्ये विवाह करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र, अक्षय भाविकावर संशय घेऊ लागला. दुसऱ्या मुलाशी भाविका व्हॉटसअपवर बोलत असते याचा त्याला राग आला. तिच्या व्हॉट्सअॅपवरील संभाषणामुळे संतापलेल्या अक्षयने तिच्यावर हल्ला करण्याचा कट रचला.
भाविका मागील चार महिन्यांपासून विरारच्या रामभजन मेडिकल स्टोअरमध्ये फार्मासिस्ट म्हणून काम करत होती. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास अक्षय तेथे पोहोचला आणि अचानक तिच्यावर चाकूने वार केले. तिच्या हातावर आणि मनगटावर गंभीर जखमा झाल्या. इतकेच नाही, तर संतापाच्या भरात त्याने तिला लाथांनी मारहाण केली, ज्यामुळे तिचा जबडा फॅक्चर झाला आहे.
या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भाविकावर एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी अक्षय पाटील अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
गेल्या काही महिन्यांत विरार आणि आसपासच्या भागात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांपुढे कायदा-सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलावी अशी मागणी होत आहे