मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाकिस्तानहून हल्ल्याची धमकी

मुंबई वाहतूक पोलिसांना शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या एका मोबाईल क्रमांकावरून संदेश आला. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपले नाव मलिक शहबाज हुमायून रजा असे सांगितले आहे.

“मुंबई वाहतूक पोलिसांना पाकिस्तानी नंबरवरून व्हॉट्सअॅप मेसेज आला आहे. यात मलिक शहबाज हुमायून रजा नावाच्या व्यक्तीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे,” असे मुंबई पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर वर्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, तपास सुरू आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही धमकी :
याआधी, २१ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. या संदर्भात शिंदे म्हणाले, “अशा धमक्या मला नवीन नाहीत. याआधीही मला धमक्या आल्या होत्या. डान्स बार बंद केल्यावरही मला मारण्याची धमकी मिळाली होती. नक्षलवाद्यांनीही धमकी दिली होती, पण मी कधीही घाबरलो नाही. उलट, मी गडचिरोलीमध्ये पहिले औद्योगिक प्रकल्प सुरू करण्याचे काम केले.”

मुंबई पोलिसांनी या प्रकरणात बुलढाणा जिल्ह्यातून दोन जणांना अटक केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या कारवर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी ईमेलद्वारे दिली होती. या धमक्यांमुळे राज्यभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top