साक्री : विद्या विकास मंडळाच्या सिताराम गोविंद पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनंत पाटील यांनी भूषवले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी बी. बी. भिल, तालुका विधी सेवा समितीचे अॅड. बी. के. पिंपळे आणि अॅड. राहुल जाधव उपस्थित होते. तसेच मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रकाश साळुंके आणि प्रा. विश्वास भामरे यांचीही विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी सतीश पेंढारकर यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेचे वैशिष्ट्य आणि महत्त्व अधोरेखित केले. यानंतर अॅड. बी. के. पिंपळे यांनी महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या विविध कायद्यांविषयी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे बी. बी. भिल यांनी मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनावर प्रकाश टाकत, तिच्या समृद्ध परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात डॉ. अनंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा कशी जपली पाहिजे आणि तिच्या संवर्धनासाठी काय करता येईल यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रकाश साळुंके यांनी केले, तर संचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. विश्वास भामरे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून मराठी भाषेप्रती आपली निष्ठा दर्शवली.
या कार्यक्रमामुळे मराठी भाषेच्या संवर्धनाची गरज आणि तिच्या अभिमानाची जाणीव विद्यार्थ्यांना नव्याने झाली, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने पार पडलेला हा कार्यक्रम प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक ठरला.
