दोंडाईचा: सहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अखेर दोंडाईचा पोलिसांनी अटक केली आहे.
सदर आरोपीवर दोंडाईचा पोलीस ठाणे आणि नंदुरबार रेल्वे पोलीस ठाणे येथे चार गंभीर गुन्हे दाखल असून निलेश खंडू संसारे (रा. डालडा घरकुल, दोंडाईचा; ह.मु. आखातवाडे, शनिमंडळ, ता. जि. नंदुरबार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दोंडाईचा येथील नंदुरबार चौफुलीजवळ आरोपी असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने कारवाई केली. संशयित इसम दादावाडी जैन मंदिराच्या पाठीमागे फिरताना दिसल्यावर पोलिसांनी त्याला घेरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळू लागला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नकुल कुमावत तसेच पोहकॉ. गिरासे, पोकॉ. सुर्यवंशी, पोकॉ. महेश शिंदे, पोकॉ. प्रविण निकुंभे, पोकॉ. अक्षय शिंदे आणि होमगार्ड अमिन शहा यांनी केली.
सदर आरोपी चोरी आणि दरोड्याचे सराईत गुन्हेगार असून त्याने इतर भागातही गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिक तपास सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नकुल कुमावत करत आहेत.
प्रतिनिधी समाधान ठाकरे
झेप मराठी दोंडाईचा