नाशिक : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या घटनेची चर्चा सुरू असतानाच, आज दि. १ मार्च रोजी नाशिकमध्येही एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी गंगापूररोडवरील हॉटेल मोगली कॅफे वर छापा टाकून कारवाई केली आहे. या कॅफेमध्ये तरुण-तरुणींना 100 ते 200 रुपये भाड्यात तासांसाठी रूम दिल्या जात असल्याचा आरोप आमदारांनी केला आहे.
गंगापूररोड परिसरातील विद्या विकास सर्कलजवळील या कॅफेबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. कॅफेच्या अंधाऱ्या खोल्यांमध्ये गैरकृत्य सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर, आमदार फरांदे यांनी आज दुपारी पोलिसांसह छापा टाकला. त्यावेळी काही तरुण-तरुणी अश्लील वर्तन करत असल्याचे आढळले. तसेच छाप्यात अनेकजण रंगेहाथ सापडले आणि कारवाई करण्यात आली.
या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया देत आमदार फरांदे म्हणाल्या,”या कॅफेमध्ये भाड्याने तासांसाठी रूम दिल्या जात होत्या. याची माहिती मिळताच आम्ही धाड टाकली. गंगापूर आणि सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे प्रकार सुरू होते. नाशिकच्या संस्कृतीला बिघडवण्याचे हे काम आम्ही खपवून घेणार नाही.”
तसेच यावेळी आ. फरांदे यांनी ड्रग्ज आणि गैरप्रकारांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला.
“कॉलेजला न जाता काही तरुण कॅफेवर जात आहेत. आम्ही कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करत नाही, पण अशा ठिकाणी गैरप्रकार होत असल्यास आम्ही कठोर भूमिका घेऊ. इंदिरानगर परिसरातूनही अशा तक्रारी आल्या होत्या, त्यावर कारवाई केली आहे.” त्यांनी पालकांनी मुलांचे कॉलेजला जाणे व्यवस्थित होत आहे की नाही, याकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही केले.
या कारवाईनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
शहरात अशा प्रकारच्या ठिकाणी गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे भविष्यात आणखी छापे मारले जातील का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.