शिंदखेडा तालुक्यातील वाडी (शेवाडी) येथे स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे ४६ वे वार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न झाले. या निमित्ताने गावातून ग्रंथदिंडी मिरवणूक काढण्यात आली. वाजत-गाजत पार पडलेल्या या दिंडीत मोठ्या संख्येने गावकरी, विद्यार्थी आणि ग्रंथप्रेमींनी सहभाग घेतला. या प्रसंगी पुस्तकांच्या महत्त्वावर व्याख्यान, ग्रंथप्रदर्शन, कादंबरी प्रकाशन, पुरस्कार वितरण आणि ग्रंथालय व्यवस्थापनावर चर्चासत्र आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी साहित्य समीक्षक प्रा. डॉ. फुला बागुल यांनी “पुस्तकांनी मला घडवलं” या विषयावर व्याख्यान दिले. ते म्हणाले, “जगातील सर्व थोर व्यक्ती पुस्तकांच्या माध्यमातूनच घडल्या आहेत. आजच्या मोबाईलच्या युगात माहिती सहज उपलब्ध होते, मात्र खरे ज्ञान केवळ पुस्तकांच्या माध्यमातूनच मिळू शकते. त्यामुळे वाचनसंस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी प्रत्येकाने पुस्तकांच्या सहवासात राहायला हवे.”
या अधिवेशनाचे उद्घाटन कृषी बाजार समिती, दोडाईचाचे सभापती श्री. नारायण पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. दत्ता परदेशी (अध्यक्ष, नाशिक विभाग ग्रंथालय संघ) होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. जगदीश पाटील, आत्माराम खांडेकर, मगन पाटील, विरेंद्रसिंग गिरासे, प्रा. डॉ. फुला बागुल, साहित्य समीक्षक डॉ. एस. पी. गिरासे, प्राचार्य कोमलसिंग गिरासे, ललित गिरासे, सुवर्णसिंग गिरासे (सरपंच, वाडी), हिम्मतसिंग गिरासे, अविनाश भदाणे (अध्यक्ष, जिल्हा ग्रंथालय संघ), कार्यवाह रोहिदास हाके, उपाध्यक्ष महेंद्र जाधव, ग्रंथमित्र आर. ओ. पाटील, परमेश्वर महाले, सुरेश मोरे, ऑड. राहुल महिरे, हंसराज शिंदे, प्रमोद वाणी, संजय पाटील, नरेंद्र देवरे, निरंजन महाजन, हिम्मतराव पाटील, ज्ञानेश्वर माळी, डी. पी. महाले, रणजित गिरासे, पंकज कदम, सुरतसिंग गिरासे, दीपक बागल, भरत गिरासे, दीपक मोरे, भीमसिंग गिरासे, श्रीमती जयश्री गावीत, श्रावण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, वाडी यांना जिल्ह्यातील उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार प्रदान करण्यात आला.याशिवाय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार – श्री. राजकिरण राजपूत (आढे, ता. शिरपूर)
उत्कृष्ट ग्रंथालय महिला सेवक ग्रंथपाल पुरस्कार – श्रीमती पुष्पा गिरासे (वरूळ घुसरे, ता. शिंदखेडा) आणि उत्कृष्ट सेवक ग्रंथपाल पुरस्कार – श्री. नाना गिरासे (वार, ता. धुळे) हेसुद्धा पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार विजेत्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात लेखक सुरेश मोरे यांच्या “बिन पगारी मास्तर” या कादंबरीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान वाचनालयाचा जमा-खर्च आणि आर्थिक व्यवस्थापन या विषयावर प्रमोद वाणी यांनी मार्गदर्शन केले.तसेच स्वागताध्यक्ष श्री. सुवर्णसिंग गिरासे यांनी सर्व पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय प्रस्तावनेत अविनाश भदाणे यांनी वाचनसंस्कृतीच्या वृद्धीसाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व पटवून दिले. सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन कार्यवाह रोहिदास हाके यांनी केले.
या अधिवेशनाला जिल्ह्यातील सर्व शासनमान्य वाचनालयांचे अध्यक्ष, ग्रंथपाल तसेच वाडीतील विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भव्य अधिवेशनातून वाचनसंस्कृतीला चालना देण्याचा संदेश देण्यात आला. ग्रंथालय संघटनेच्या या प्रयत्नामुळे समाजात पुस्तकांविषयी जागरूकता वाढेल आणि ज्ञानसंपन्न समाज घडेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

