बिबट्याच्या हल्ल्याच्या नावाखाली निर्दयी खून; बिबट्या नव्हे, नात्यातीलच खुनी !

दोन महिन्यांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मात्र, पुढील पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामुळे नसून, एका सुनियोजित कटाचा भाग होता. यवत पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख आणि फौजदार सलीम शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. आरोपीने खुनाची कबुली दिल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पुण्यातील यवत येथे ७ डिसेंबर २०२४ रोजी लता बबन धावडे (५०) या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. पुतण्या अनिल पोपट धावडे (४०) याने तक्रार दाखल केली होती की, त्याच्या चुलतीवर बिबट्याने हल्ला केला आणि ती जागीच मृत्यू पावली. घटनास्थळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आणि प्रकरणाचा तपास सुरू झाला.

महिलेच्या मृत्यूचे कारण अधिक स्पष्ट होण्यासाठी नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. मात्र, काही दिवसांनी आलेल्या वैद्यकीय अहवालात संशयास्पद बाबी समोर आल्या, ज्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशाच बदलली.

३ मार्च रोजी फौजदार सलीम शेख यांना गुप्त माहिती मिळाली की, लता धावडे यांचा मृत्यू साधा अपघात किंवा बिबट्याचा हल्ला नसून, तो सुनियोजित कटाचा भाग आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि संशयित सतीलाल मोरे याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत मोरे पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, कसून चौकशी केल्यानंतर त्याने अखेर कबुली दिली की, लता धावडे यांचा खून त्याने आणि अनिल धावडे यांनी मिळून केला होता.
पोलिस तपासात उघड झाले की, अनिल धावडे आणि त्याची चुलती लता धावडे यांच्यात अनैतिक संबंध होते. दोघे शेतात भेटत असत. मात्र, काही दिवसांपासून लता धावडे अनिलला भेटायला नकार देत होती आणि पैशांची मागणी करत होती. यामुळे अनिल त्रस्त झाला आणि त्याने तिला संपवण्याचा कट रचला.

अनिलने त्याचा साथीदार सतीलाल मोरे याला या कटात सहभागी करून घेतले आणि त्याला दीड लाख रुपये देण्याचे कबूल केले. ठरल्याप्रमाणे, दोघांनी मिळून लता धावडे यांचा चेहरा व डोके ठेचून निर्दयीपणे हत्या केली.

कोणालाही संशय येऊ नये म्हणून अनिल आणि सतीलाल यांनी बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव रचला. मृतदेह शेताच्या बाजूला टाकून त्यांनी गावकऱ्यांना आणि पोलिसांना सांगितले की, बिबट्याने हल्ला केला आणि त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. या खोट्या कहाणीमुळे काही काळ हा प्रकार बिबट्याच्या हल्ला असल्याचे मानले गेले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला, पण बिबट्याचे ठसे आणि हल्ल्याचे स्वरूप पाहता संशय निर्माण झाला.
नागपूर प्रयोगशाळेच्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले की, लता धावडे यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामुळे झाला नसून ती मारहाणीमुळे मृत पावली आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आणि खूनाचे गूढ उलगडले. अनिल धावडे आणि सतीलाल मोरे या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोघांनाही न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी मिळवण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर दौंड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. एका महिलेला निर्दयीपणे मारून, बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव रचल्याची घटना ऐकून नागरिकही हादरले आहेत. गावकऱ्यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला असून, आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी केली जात आहे. पोलिस आता या प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा तपास करत असून, अनिल धावडे आणि सतीलाल मोरे यांच्यावर कठोर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top