धुळे जिल्ह्यातील साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. आमदार सौ. मंजुळाताई गावित यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम १ ते १८ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी राबविण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित वैद्यकीय तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना मोफत औषध उपचार दिले. तसेच, ग्रामिण आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षकांनी उपस्थित पालक आणि महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी मुलांच्या नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व आणि औषध वेळेवर घेण्याची आवश्यकता यावर भर दिला.या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्यांवर वेळेत लक्ष केंद्रित करून त्यांना आवश्यक उपचार पुरवले गेले. तसेच, शाळकरी मुलांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे हे समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला साक्री ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. रेखा गवई, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बोरकर, महिला आणि बालविकास विभागाच्या कविता भामरे, लोकप्रतिनिधी पंकज मराठे, तसेच ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि महिला उपस्थित होते . राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थित अधिकारी आणि पालकांनी व्यक्त केला.
