धुळे: निकम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गोंदूर येथे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.० कार्यक्रम संपन्न झाला. या प्रशिक्षणासाठी धुळे जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील १,१०० हून अधिक शिक्षकांनी सहभाग घेतला असून, उर्वरित २,२०० शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.
यावेळी धुळे पंचायत समितीचे नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी भरत नागरे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “ज्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते, त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली असते.” त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे ज्ञान पोहोचवले पाहिजे. तसेच, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिक्षकांनी स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. बी. घुगे यांनी शिक्षकांच्या व्यावसायिक विकासावर भर देताना सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून अध्यापन करणे गरजेचे आहे.” त्यामुळे असे प्रशिक्षण शिक्षकांना अधिक सक्षम बनवते.
निकम इन्स्टिट्यूट येथे सुरू असलेल्या या प्रशिक्षणात विविध शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले, त्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण आराखडा २०२०, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत व शालेय स्तर), समग्र प्रगती पत्रक आणि क्षमता आधारित मूल्यांकन यांचा समावेश आहे.
धुळे तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण सहा टप्प्यांत दिले जात आहे. सध्या ४०० शिक्षक प्रशिक्षण घेत आहेत, तर ३७ प्रशिक्षक हे प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या भूमिकेत मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांनी पुस्तकी शिक्षणाबरोबरच इतर माध्यमांद्वारेही विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यावर भर द्यावा, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी भरत नागरे यांनी केले. या यशस्वी प्रशिक्षण कार्यक्रमामुळे शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीत सकारात्मक बदल घडेल आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्तर उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला शालेय पोषण आहार अधीक्षक प्रमोद सोनार, शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. बी. घुगे, परशुराम खैरनार, गट समन्वयक अनिल वानखेडे, केंद्रप्रमुख प्रेमानंद उपाचार्य, किशोर पाटील, सतिश जोशी, प्रणव पाटील, योगेश अडावदकर, तसेच निकम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संस्थाध्यक्ष प्रा. रविंद्र निकम यांची उपस्थिती होती.
प्रतिनिधी तुषार देवरे,
झेप मराठी देऊर .
