धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे विकास कामांच्या शुभारंभ निमित्त आज 30 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात मराठी उद्योजकांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. पत्रकारांनी त्यांना राज्यपालांच्या वक्तव्या संदर्भात छेडले असता उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही कारण मराठी उद्योजकानी महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान दिले असून आपल्या योगदानामुळे जगभर नाव कमावले आहे. परंतु एखादे वक्तव्य करताना अलंकारिक बोलावे तसे राज्यपाल महोदय बोलले असावेत. त्यांनाही मराठी उद्योजकांच्या योगदानाची जाणीव आहे त्यामुळे राज्यपालांचा उद्देश मराठी उद्योजकांना डिवचने असा नसावा, असे असले तरी त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, असे फडणवीस म्हणाले. हे खरे आहे की, महाराष्ट्राच्या विकासात गुजराती, मारवाडी किंवा अन्य जाती धर्मीय यांचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे विकासातील हे योगदान नाकारून चालणारे नाही, असे ते म्हणाले.
सध्या विरोधी पक्षनेते राज्याच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर बोलत आहेत. ते विरोधकांचे कामच आहे. अजित दादा पवार यांना किमान विरोधी पक्षनेते झाल्यावर तरी विदर्भाची आठवण झाली याचे समाधान वाटते. आज विदर्भाच्या प्रश्नांवर बोलणारे अजित पवार हे सत्तेत असताना विदर्भात गेले असते, त्यासंदर्भात बोलले असते तर अधिक बरे वाटले असते, असे खोचक वक्तव्य देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, खासदार डॉ सुभाष भामरे हेही उपस्थित होते.