धुळे: राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महिला आघाडीने धुळ्यात तीव्र आंदोलन छेडले. उपनेत्या शुभांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.
महिला सुरक्षेच्या बाबतीत सत्ताधारी महायुती सरकारचे अपयश स्पष्ट होत असल्याचे आंदोलकांनी ठणकावले. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या अमानुष घटनेनंतर अवघ्या सात दिवसांतच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या अल्पवयीन मुलीसोबत मुक्ताईनगर येथे घडलेल्या छेडछाडीच्या घटनेने महिलांमध्ये भयाचे वातावरण निर्माण केले आहे. विशेष म्हणजे, या घटनेत आरोपी सत्ताधारी पक्षाशी संलग्न असल्याने त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही.
शिवसेना महिला आघाडीने या प्रकाराला तीव्र विरोध दर्शवत सरकारवर टीका केली. “महिला मतांवर निवडून आलेले सरकार जर महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असेल, तर हे राज्यातील भगिनी खपवून घेणार नाहीत,” असे उपनेत्या शुभांगी पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच, महिलांवरील गुन्हेगारी रोखण्यासाठी तातडीने कडक उपाययोजना आखून त्या मंत्रिमंडळात मंजूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
जर सरकारने त्वरित कारवाई केली नाही, तर राज्याचे गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली. या आंदोलनात शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील, डॉ. जयश्री वानखेडे, संगीता जोशी, सुनिता वाघ, माधुरी सोनवणे, ज्योती चौधरी, मुक्ता सोनवणे यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना सरकारने तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
