धुळे शहरात झालेल्या जबरी चोरी प्रकरणी पोलिसांनी जलद कारवाई करून दोन आरोपींना अटक केली असून, चोरी गेलेला संपूर्ण माल हस्तगत करण्यात आला आहे.
फिर्यादी दिनेश मनोहर शर्मा (वय ३९, व्यवसाय पुजारी, रा. भाईजी नगर, चितोड रोड, धुळे) हे २८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ११ वाजता पांझरा नदीकिनारी सिध्देश्वर गणपती मंदीर ते कालिका माता मंदीर दरम्यान जॉगिग ट्रॅक वर वॉकिंग करत असताना पंचमुखी मंदीराचे पाठीमागुन पांझरा नदीपात्रातुन ३ अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यांनी फिर्यादीला बेसबॉलच्या दांडक्याने मारहाण केली, चाकू दाखवून धमकावले आणि त्यांचा गळ्यातील ३ तोळे वजनाची सोन्याची चेन आणि खिशातील ४,००० रुपये हिसकावले. त्यानंतर हे तीन आरोपी मोटारसायकलने पळून गेले.
या घटनेनंतर १ मार्च २०२५ रोजी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक सक्रिय झाले. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखालील डी.बी. पथकाने वेगाने तपास करून सुनिल रामचंद्र गायकवाड (वय ३९) आणि बाळासाहेब मिलिंद देवरे (वय ३४) या दोघांना अटक केली असून तिसऱ्या आरोपीचा तपस सुरु आहे . हे दोघे गणपती मंदिर परिसरात आढळून आले. त्यांनी चोरी करताना वापरलेली मोटार सायकल आणि चोरीस गेलेला संपुर्ण माल हस्तगत करुन त्याना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून ३ तोळे वजनाची आणि ९० हजार रुपयाची सोन्याची चेन, रोख रक्कम ४ हजार रुपये , ५० हजार रुपयांची होंडा शाईन मोटारसायकल तसेच चाकू आणि बेसबॉल दांडा असा एकूण १ लाख ४४ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या यशस्वी कारवाईमुळे धुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.
