महाराष्ट्रातील गेवराई तालुक्यातील राज पिंपरी येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला विष पाजून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असुन कोमल नागेश पाटोळे असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सात वर्षांपूर्वी कोमल आणि नागेश पाटोळे यांचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मात्र, पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. अखेर हा वाद इतका टोकाला गेला की संतप्त पतीने कोमलला बळजबरीने विष पाजले, असा गंभीर आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे.
या घटनेत केवळ पतीच नव्हे, तर सासरच्या इतर सदस्यांचाही सहभाग असल्याचा आरोप कोमलच्या नातेवाईकांनी केला आहे. विष पाजल्यानंतर कोमलची प्रकृती अचानक बिघडली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बीड जिल्हा रुग्णालयात मृत महिलेच्या नातेवाईकांनी जोरदार आक्रोश व्यक्त करत ,जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा ठाम पवित्रा घेतला आहे. सध्या गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.