राज्यातल्या महिलांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांनी सगळे हादरून गेले आहेत. पुण्यातलं स्वारगेट प्रकरण ताजं असतानाच, आता छत्रपती संभाजीनगरातली एक घटना अंगाचा थरकाप उडवणारी आहे!
एका 19 वर्षांच्या तरुणानं चक्क आपल्या नातेवाईक महिलेलाच क्रूरतेच्या थराला जाऊन सपासप वार केले! कारण काय? फक्त तिनं शरीरसुखाला नकार दिला! ह्या भस्मासुरानं तिच्या शरीरावर इतके वार केलेत की तिला तब्बल 280 टाके घालावे लागलेत. एक सव्वादोन फुटांचा वार तर मानेपासून मांडीपर्यंत आहे. कल्पना करा, किती भयंकर हाल झाले असतील त्या महिलेचे!
“माझ्या शरीराची चक्क गोधडी झाली”
हे या महिलेला तोंडून आलेलं एकच वाक्य पुरेसं आहे, हे समजायला की हल्ला किती भयंकर होता. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ती म्हणाली,
“त्याने एवढे वार केलेत की डॉक्टरांना माझ्या शरीराला गोधडीसारखं शिवावं लागलं! हे टाके शिवायला लागणारा दोरा एकटा 22 हजाराचा आहे! संपूर्ण अंगावर फक्त जखमा आहेत. रडायचंही नाही, कारण डोळ्यातून आलेलं पाणी जखमेवर पडलं तरी आग होईल! आता मी काय करू?”
कसला क्रौर्याचा कळस होता हा?
रविवारची दुपार होती. ही महिला शेतात काम करत होती. अचानक तिच्या भावकीतल्या अभिषेक नावाच्या नराधमानं फोन केला. म्हणाला –
“एक तर माझ्याबरोबर झोप, नाहीतर तुझ्या जावेशी माझी सेटिंग लाव!”
हे ऐकल्यावर महिलेचा संताप झाला. तिनं फोन कट केला. पण संध्याकाळी जे झालं, ते कल्पनाही न केलेलं होतं…
ही महिला शेतातून घरी निघाली, आणि अचानक अभिषेक पाठीमागून आला. जोरात वेणी ओढली, डोकं थेट दगडावर आपटलं! बेशुद्ध होण्याआधी तिनं फक्त इतकंच पाहिलं – त्याच्या हातात कटर होतं!
पहिल्यांदा चेहऱ्यावर, मग गळ्यावर, आणि मग अक्षरशः शरीरभर सपासप वार! रक्त थांबत नव्हतं. कपडे फाटले. महिलेच्या हालचालीला कंटाळून त्या राक्षसानं मोठा दगड उचलला आणि तिच्यावर आपटला! ती वेदनेनं विव्हळली. पण तरीही दुसरा दगड आणखी जोरात तोंडावर!
रक्ताचा पूर वाहत होता, पण तो थांबत नव्हता…
ती बेशुद्ध पडली. जेव्हा शुद्धीवर आली, तेव्हा डोळे उघडत नव्हते. दोन्ही हात सलाईनमध्ये होते. तिच्या शरीरातून तब्बल 400 मिली रक्त वाहून गेलं होतं! डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी 5 बाटल्या रक्त चढवलं.
आरोपीला जराही लाज नाही!
हा नराधम अभिषेक नवपुते पोलिसांच्या तावडीत सापडलाय. पण धक्कादायक म्हणजे तो गावात अशा थाटात फिरत होता, जसं काही झालंच नाही! त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नाही. न्यायालयानं त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पण हा राक्षस केवळ तीन दिवसांत सुटून परत रस्त्यावर येणार का?
हा प्रश्न फक्त छत्रपती संभाजीनगरचा नाही, तर प्रत्येक शहरातल्या, प्रत्येक गावातल्या, प्रत्येक घरातल्या स्त्रीचा आहे. जर अपराध्यांना कठोर शिक्षा नाही झाली, तर अशा घटनांचा उद्रेक थांबेल का?
