रस्त्याच्या कडेला झोपलेल्या तिघांना चिरडले !

रस्त्याच्या कडेला थकून झोपलेल्या तीन मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना मंगळवार दि. ११ मार्च रोजी पहाटे जळगावमधील नशिराबादजवळ घडली. दिवसभर श्रम करून थकलेल्या या मजुरांनी फक्त काही तासांची विश्रांती घेतली, मात्र एका अज्ञात वाहनाने झोपलेल्या अवस्थेत त्यांना चिरडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

नशिराबादजवळील खुर्द गावात सध्या पुलाच्या कामासाठी अनेक परप्रांतीय मजूर काम करत आहेत. रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या या मजुरांनी काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे काम संपवल्यानंतर पुलाच्या कडेला अंग टाकले. पहाटेच्या अंधारात एका अज्ञात वाहनाने वेगाने येऊन झोपलेल्या मजुरांना चिरडले. गाडीचा वेग इतका होता की तिघांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.

नशिराबाद पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तिघांचेही मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. मृत मजुरांची ओळख अद्याप पटलेली नाही, मात्र ते सर्व परप्रांतीय असल्याची शक्यता आहे. या घटनेमुळे मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसेच पुलाच्या बांधकामासाठी आलेले हे मजूर कुठून आले होते, त्यांची ओळख काय ? याचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top