दोंडाईचा शहरातील घरफोडीच्या एका गुन्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून, तिसरा अद्याप फरार आहे.
दोंडाईचा येथील गोविंद नगर येथे राहणाऱ्या रुक्साना शेख शहीद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या उपचारासाठी धुळ्यातील सरकारी रुग्णालयात भरती होत्या. यावेळी अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचे पाहून कुलूप तोडले आणि आत प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ₹६०,६०० चा ऐवज चोरून नेला.
या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस हवालदार रविंद्र गिरासे यांना जबाबदारी देण्यात आली होती. तपासादरम्यान, पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना गुप्त माहिती मिळाली की दोन संशयित इसम गरीब नवाज कॉलनीत फिरत असून, ते घरफोडी करण्याच्या तयारीत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून शुभम उर्फ जयेश चौधरी आणि रोहित रविंद्र पवार यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच त्यांनी चोरलेली ₹२०,००० रोख रक्कम तिसऱ्या साथीदाराकडे असल्याचे समोर आले आहे. हा तिसरा आरोपी नदीम शहा सध्या फरार असून, पोलिस त्याच्या शोधात आहेत.
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर विभाग श्री. सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली दोंडाईचा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोनि श्री.किशोरकुमार परदेशी यांचे नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक नकुल कुमावत व शोध पथकातील अंमलदार पोहकॉ गिरासे, पोको सुर्यवंशी, प्रविण निकुंभे, सौरभ बागुल, रोकडे आणि होमगार्ड अमिन शहा यांनी केली.
सदर आरोपी हे घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यात सराईत असल्याची शक्यता असल्याने त्यांच्यावर इतर गुन्ह्यांचे आरोपही असल्याचा पोलिसांचा संशय आहे. पुढील तपास पोसई रविंद्र गिरासे करीत आहेत.
प्रतिनिधी समाधान ठाकरे
झेप मराठी दोंडाईचा