लाच घेताना औषध निरीक्षक व खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात

धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मोठी कारवाई करत एका औषध निरीक्षकासह खाजगी इसमाला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदाराकडून ८,००० रुपयांची लाच स्वीकारताना हे दोघेही एसीबीच्या सापळ्यात अडकले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

शिरपूर येथे पशुपक्षी फार्मचे दुकान सुरू करण्यासाठी एका व्यक्तीने २५ फेब्रुवारी २०२५ रोजी अन्न व औषध प्रशासन, धुळे विभागाकडे ऑनलाइन अर्ज केला होता. यानंतर, तक्रारदार आणि त्यांच्या आतेभावाने आरोपी क्रमांक १ किशोर देशमुख (औषध निरीक्षक, धुळे) यांची भेट घेतली. यावेळी देशमुख यांनी सांगितले की, स्थळ निरीक्षणासाठी ते स्वतः ४ मार्च २०२५ रोजी येणार असून, यासाठी आरोपी क्रमांक २ तुषार जैन यांच्याकडे ८,००० रुपये द्यावे लागतील, अन्यथा परवानगी मिळणार नाही.

यावर संशय आल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबी पथकाने लगेच पडताळणी केली आणि ४ मार्च रोजी स्थळनिरीक्षणाच्या वेळी तुषार जैनने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली, तर औषध निरीक्षक देशमुख यांनीही लाच देण्यास प्रोत्साहन दिले.

एसीबीचा यशस्वी सापळा

११ मार्च २०२५ रोजी धुळे एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराकडून ८,००० रुपयांची लाच घेताना तुषार जैनला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर औषध निरीक्षक किशोर देशमुख यालाही ताब्यात घेण्यात आले. दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी

सापळा पर्यवेक्षण अधिकारी: सचिन साळुंखे, पोलीस उपअधीक्षक, धुळे
तपास अधिकारी: रूपाली खांडवी, पोलीस निरीक्षक, धुळे
मार्गदर्शक अधिकारी: श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, नाशिक परीक्षेत्र

प्रशासनाने घेतली दखल

या प्रकरणी आरोपींच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवण्यात आला आहे. औषध निरीक्षकांविरोधात कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे आयुक्त सक्षम अधिकारी असणार आहेत.

या कारवाईमुळे अन्न व औषध प्रशासन विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला असून, अशा लाचखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top