सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मुले गतिमंदच असल्याच्या चिंतेतून आईने आपल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आपलं जीवन संपवलं. ही घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी गावात काल १२ मार्च रोजी दुपारी घडली. मृतांमध्ये चित्रा कविराज हाके (वय २८), पृथ्वीराज हाके (वय ७) आणि स्वराज हाके (वय दीड वर्षे) यांचा समावेश आहे.
हाके कुटुंब मूळचे सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथील आहे. काही वर्षांपूर्वीच कविराज उर्फ दत्तात्रेय हाके कुटुंबासह आपल्या पत्नीच्या माहेरी वांगी येथे राहायला आले होते. त्यांना आठ वर्षांची एक मुलगी असून पृथ्वीराज आणि स्वराज ही त्यांची दोन लहान मुलं होती. पृथ्वीराज जन्मतःच गतिमंद होता. त्यानंतर जन्माला आलेला स्वराज देखील गतिमंदच निघाला.
एकाच घरातील दोन्ही मुलं गतिमंद असल्याने त्यांची आई चित्रा हाके सतत मानसिक तणावात असत. त्यांनी शेवटी या चिंतेतून टोकाचा निर्णय घेतला. बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास, चित्रा हाके यांनी आपल्या दोन मुलांसह गावाजवळील ८० फूट खोल विहिरीत उडी घेतली.
त्या वेळी विहिरीपासून काही अंतरावर शेळ्या चारणाऱ्या एका तरुणीने काहीतरी पाण्यात पडल्याचा आवाज ऐकून विहिरीकडे धाव घेतली. मात्र विहिरीलगत दाट झाडी असल्याने तिला तिथे पोहोचायला वेळ लागला. विहिरीत डोकावून पाहिल्यावर तिला तीन वर्षांचा स्वराज पाण्यावर तरंगताना दिसला. या घटनेची माहिती काही क्षणांत गावभर पसरली आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पुढील तपस सुरु आहे.