धुळे : देऊर बुद्रुक येथील धर्मराज विद्याप्रसारक संस्थेच्या ठाकूर वॉरियर्स आणि योगेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन ‘हृदय रंग’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अप्रतिम सांस्कृतिक कलाविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. हिंदी, मराठी, अहिराणी देशभक्तीपर गीते, कोळीगीते आणि महाकुंभ यांसारख्या विविध कलाप्रकारांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेची चमक दाखवली.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी समाजसेवक दीपक दीक्षित (गणू महाराज), जिल्हा परिषद सदस्य जिजाबाई पारधी, आनंद पाटील, देऊरचे सरपंच भाऊसाहेब देवरे, नेरच्या सरपंच गायत्री जयस्वाल, देऊर खुर्दच्या सरपंच पूनम देसले, नांद्रेचे सरपंच महेश पाटील, उपसरपंच धनंजय देवरे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
चार तास चाललेल्या या कार्यक्रमात लहानग्यांनी पहिल्यांदाच देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करत प्रेक्षकांची मने जिंकली. या वेळी शाळेच्या विद्यार्थी दयाल नेरे, चिराग देवरे, रुद्र राजपुरोहित, वीरा बोरसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कुणाल पाटील यांनी ग्रामीण भागातील या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व बक्षिसे प्रदान केली. मुख्याध्यापक अजय ठाकूर यांनी प्रास्ताविक केले, तर शिक्षिका दीपिका देवरे यांनी सूत्रसंचालन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले. तसेच पोलीस प्रशासनानेही या कार्यक्रमास सहकार्य केले.
प्रतिनिधी तुषार देवरे, देऊर

