जिल्ह्यात 4 हॉस्पिटल, 16 सोनोग्राफी व 8 एमटीपी सेंटरची तपासणी
गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा 1994 सुधारित 2003 ची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढावा याकरीता महसूल, आरोग्य व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने धुळे जिल्ह्यातील सोनोग्राफी, एमटीपी व प्रसूतीगृहांची धडक मोहीमेतंर्गत तपासणी करण्यात आली. या तपासणीत 2 हॉस्पिटल व 1 सोनोग्राफी सेंटरला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा 1994 सुधारित 2003 ची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, याकरीता धुळे जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी, एमटीपी व प्रसूतीगृह यांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा पीसीपीएनडीटी जिल्हास्तरीय दक्षता समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी बैठकीत दिले होते. त्यानुसार महसूल विभाग, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांचे संयुक्तरीत्या चार पथके तयार करून धुळे जिल्ह्यात एकाच दिवशी 16 सोनोग्राफी सेंटर, 8 एमटीपी सेंटर तसेच 4 हॉस्पीटलची तपासणी करण्यात आली. यात जिल्ह्यातील शहरी भागातील 4 हॉस्पीटलची तपासणी केली असून 2 हॉस्पिटलला नोटिस बजावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तालुकास्तरीय पथकामार्फत साक्री येथील 9 सोनोग्राफी सेंटर तर 4 एमटीपीची तपासणी केली. तसेच शिंदखेडा येथील 3 सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यात आली. त्यातील 1 सेंटरला नोटीस बजावण्यात आली आहे. तर शिरपुर येथे 4 सोनोग्राफी व 4 एमटीपी सेंटरची धडक मोहिमे अंतर्गत तपासणी करण्यात आली आहे. या कारवाईनंतर पुढील कालावधीत या प्रकारची कारवाई संपूर्ण जिल्ह्यात तसेच गुजरात व मध्यप्रदेश सीमेलगतच्या सोनोग्राफी सेंटरवर करण्यात येणार आहे.
धुळे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अवैधरित्या गर्भलिंग निदान चाचणी व गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी टोल फ्री क्रमांक 18002334475/104 किंवा http://amchimulgimaha.in या संकेतस्थळावर माहिती देण्यात यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल व दिलेली माहिती खरी असल्यास खबरी योजनेतंर्गत माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. असेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देगांवकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.