“वंशाचा दिवा असलाच पाहिजे” या सामाजिक दृष्ट्या बांधिलकी असलेल्या परंपरेला छेद देऊन सावित्रीच्या लेकींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग देत नवा आदर्श निर्माण केला. या कार्यामुळे संपूर्ण गावात व परिसरात समाधान आणि कौतुक व्यक्त केले जात आहे.
शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील आदर्श शेतकरी देवराम चिंधा देवरे यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी दिनांक १९ रोजी सकाळी ६ वाजता निधन झाले. देवरे यांच्या कुटुंबात चार मुली आणि एक मुलगा होता. मात्र, दुर्दैवाने त्यांचा मुलगा प्रविण देवरे यांचे अल्पवयात अपघातात निधन झाले. त्यामुळे कुटुंबात ‘वंशाचा दिवा’ म्हणावा असा कोणीही नव्हता. पण त्यांच्या चार कन्यांनी आपल्या वडिलांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली .
देवराम देवरे यांची मुलगी संगीताबाई गुलाब पाटील (रा. हातनूर, ता. शिंदखेडा), रेखाबाई पंकज पाटील (रा. जवखेडा, ता. अमळनेर), कल्पनाबाई विनोद पाटील (रा. धुळे) आणि चित्राबाई अनिल पाटील (रा. वैजनाथ, ता. जळगाव) यांनी आपल्या वडिलांची संपूर्ण जबाबदारी लहानपणापासूनच घेतली होती.मुलींच्या कर्तव्यपरायणतेची प्रचिती देत, तिन्ही बहिणींनी विचारविनिमय करून निर्णय घेतला की, “वंशाचा दिवा” आपणच आहोत. आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार स्वतःच्या हाताने करायचे आणि समाजासमोर एक नवीन आदर्श ठेवायचा. त्यानुसार, मोठी मुलगी संगीताबाईसह अन्य तिन्ही बहिणींनी वडिलांच्या मुखात पाण्याचे थेंब टाकून त्यांना अग्निडाग दिला.
मुलींच्या या निर्णयाचे आणि कृतीचे सर्वत्र कौतुक झाले. उपस्थितांमधून “सावित्रीच्या लेकींनी आपले कर्तव्य योग्य रीतीने पार पाडले,” असे उद्गार निघाले. समाजात मुलींच्या समान हक्कांबाबत असलेली मानसिकता बदलण्याच्या दिशेने या घटनाक्रमाने मोठा संदेश दिला आहे.
समाधान ठाकरे
दोंडाईचा
