धुळे शहरातील देवपूर उपनगरात वीट भट्टी परिसरात जागेवरील अतिक्रमणाबाबत धुळे महानगरपालिका व महसूल प्रशासनाच्या संयुक्त कार्यवाहीतून कालबद्धरित्या अतिक्रमण काढण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
धुळे शहरातील देवपूर उपनगरातील अतिक्रमित जागेबाबत सदस्य अनुप अग्रवाल यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
या सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, ही जागा १९५१- ५२ मध्ये कारागृहाकडे होती. मात्र २ जानेवारी १९६० रोजी ही ६.१४ हेक्टर जागा कारागृहाकडून महसूल विभागाकडे आली. या भागात नदी – नाल्याची पूर रेषा आहे. पूररेषेच्या आत ५.३२ हेक्टर आणि पूररेषेच्या बाहेर ०.८२ हेक्टर क्षेत्र आहे. या क्षेत्रावर १४६ अतिक्रमणे असून त्यापैकी २४ पक्की घरे आहेत. या क्षेत्रावर २०११ पूर्वीची अतिक्रमणे असल्यामुळे त्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.
पूररेषेच्या आत असलेल्या ५.३२ हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमणे काढण्यासाठी धुळे महानगरपालिका आणि महसूल प्रशासन यांच्यात बैठक झाली आहे. बैठकीतील निर्णयानुसार कालबद्ध कार्यक्रम आखून ही जागा अतिक्रमणमुक्त करण्यात येईल, असेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.