धुळे | साक्री-पिंपळनेर रोडवरील मालपूर कासारे फाट्याजवळ असलेल्या भागड्या डोंगराला आज दुपारी अचानक आग लागली. झाडे आणि गवताला लागलेल्या या आगीत डोंगरावरील व डोंगराखालील मोठ्या प्रमाणावर वनस्पती जळून खाक होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सध्या ही आग अधिकाधिक पसरत असून, स्थानिक निसर्गप्रेमी व पर्यावरण कार्यकर्त्यांनी त्वरित याची दखल घेण्याचे आवाहन केले आहे. अद्याप या आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी, ही मानवनिर्मित आग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर परिसरात चिंता व्यक्त होत असून, कालच ढेरमाळ डोंगरालाही आगीने वेढले होते. तसेच, गंगापूरजवळच्या फॉरेस्ट एरियामध्ये आणि जळगावजवळील डोंगरांनाही आगी लावल्या गेल्याची माहिती समोर आली आहे.
या साखळीपद्धतीने घडणाऱ्या घटनांमुळे, यामागे एखाद्या व्यक्ती किंवा गटाचा हेतू असण्याची शंका निसर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकारांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
स्थानिक प्रशासन, वनविभाग, पत्रकार आणि नागरिकांनी याची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे, अन्यथा परिसरातील निसर्गसंपत्तीचा मोठा विनाश अटळ ठरेल.
प्रतिनिधी निलेश सावळे
