दहा पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
मुंबई : राज्यातील पत्रकारांच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पत्रकार संरक्षण कायद्याचे नोटिफिकेशन लवकरच जारी करण्यात येईल, तसेच ‘पत्रकार सन्मान योजने’च्या अटी शिथिल करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
राज्यातील दहा प्रमुख पत्रकार संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच’ च्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. जनसुरक्षा विधेयक आणि पत्रकार संरक्षणाच्या मुद्द्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीस गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या अखेरीस मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी पत्रकार संरक्षण कायद्याच्या नोटिफिकेशनचा मुद्दा उपस्थित केला. कायदा पारित होऊनही त्याचे नोटिफिकेशन न निघाल्याने प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी याची तातडीने दखल घेत गृहसचिवांना नोटिफिकेशन तत्काळ जारी करण्याचे निर्देश दिले. तसेच, ‘पत्रकार सन्मान योजना’ ज्येष्ठ पत्रकारांसाठी असूनही त्यातील अटी अत्यंत कठोर असल्याने अनेक पात्र पत्रकार या योजनेपासून वंचित राहत असल्याची बाबही देशमुख यांनी मांडली. यावर मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना नियम शिथिल करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.