धुळे : ‘100 दिवस कृती कार्यक्रम’ मोहिमेअंतर्गत धुळे जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 6 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांना प्रशासनाचा थेट अनुभव मिळावा, यासाठी एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती स्तरावर ‘एक दिवसीय क्षेत्रभेट कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पंचायत समितीच्या विविध विभागांना भेट देत त्यातील कामकाज, प्रक्रियांचे थेट निरीक्षण केले. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांमधूनच सभापती, उपसभापती व गटविकास अधिकारी निवडून प्रत्यक्ष पंचायत समितीची सर्वसाधारण सभा देखील घेण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना निर्णयप्रक्रिया, चर्चा व प्रशासनाचे अनुभवात्मक ज्ञान मिळाले.
कार्यक्रमाचा पुढचा टप्पा जिल्हा परिषद कार्यालयात घेण्यात आला. येथे विद्यार्थ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, कॉन्फरन्स हॉल आणि विविध प्रशासकीय विभागांची माहिती देण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नरवाडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले व सर्वांना प्रेरणादायी बक्षिसे दिली.
विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करत सांगितले की, “हा अनुभव आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरेल. शाळेतील शिक्षणासोबत प्रत्यक्ष अनुभवाने आत्मविश्वास वाढतो.”
या उपक्रमात श्री. गणेश चौधरी (गटविकास अधिकारी), श्री. विठ्ठल घुगे (गटशिक्षणाधिकारी), डॉ. मनीष पाटील (वैद्यकीय अधिकारी), श्री. दीपक बांगर (उपअभियंता), श्रीमती सुजाता बोरसे (विस्तार अधिकारी), श्री. सुरेश मांडे व डी.के. सोनवणे (पंचायत समिती, धुळे) यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रतिनिधी तुषार देवरे, देऊर

