जळगाव शहरातील महाबळ रस्त्यावरील अरुंधती अपार्टमेंटमध्ये भरदिवसा चोरीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्यांनी एका पत्रकाराच्या घराचे कुलूप तोडून घरातील सोनं, चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना आज १० एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुंधती अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर पब्लिक लाईव्ह पोर्टलचे संपादक काशिनाथ चव्हाण आपल्या कुटुंबासह राहत आहेत. आज दुपारी त्यांच्या पत्नी दोन मुलांना घेऊन अपार्टमेंटजवळील ब्युटी पार्लरमध्ये गेल्या होत्या. त्या अवघ्या अर्ध्या तासात चोरट्यांनी संधी साधून घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडले आणि कपाटातील ७ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ५ तोळे चांदीचे ब्रासलेट आणि सुमारे ८५ हजार रुपयांची रोकड असा ऐवज लंपास केला.
जेव्हा चव्हाण यांच्या पत्नी घरी परतल्या, तेव्हा त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात प्रवेश करताच चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ रामानंद नगर पोलीस ठाण्याला कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.