वीटाई (ता. साक्री) | साक्री तालुक्यातील वीटाई गावाच्या परिसरातील जंगलामध्ये लागलेल्या आगीने गुरुवारी (११ एप्रिल) रात्री ७.३० वाजता रौद्र रूप धारण केले. आग नेमकी केव्हा लागली हे स्पष्ट नसले तरी रात्रीच्या अंधारात तिच्या ज्वाळा आणि धुरामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे संपूर्ण वीटाई परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच साक्री तालुक्याच्या देरमाळ डोंगर भागात लागलेली वणवा अद्याप पूर्णपणे विझलेली नाही. ही आग दिवसेंदिवस अधिकच पसरत असल्याने ती मोठ्या संकटाचे रूप धारण करत आहे. दिवसा ही आग सहज दिसत नसली तरी रात्री मात्र ती स्पष्टपणे जाणवते, हे विशेष.
या घटनांमुळे निसर्गप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. निसर्ग मित्र समितीने आग लावणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वन विभागाकडे केली आहे. तसेच, वन अधिकारी, कर्मचारी आणि वन संरक्षक समित्यांचे नेमके कार्य काय आहे? हा सवाल आता स्थानिक लोकांसह निसर्गप्रेमींनीही उपस्थित केला आहे.
वनसंपत्तीचे आणि जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असताना वन विभागाचे दुर्लक्ष हे गंभीर बाब मानली जात आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आगीवर नियंत्रण मिळवणे आणि दोषींना शिक्षा करणे आवश्यक आहे, अन्यथा ही परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रतिनिधी निलेश सावळे

