धुळे मनपात ‘आयएएस’ दर्जाच्या प्रशासकाची नियुक्ती करण्याबाबत आयुक्तांची शिफारस

मा आ. अनिल गोटेंच्या तक्रारींवर विभागीय आयुक्तांची शिफारस

धुळे महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त, श्रीमती अमिता दगडे पाटील यांच्यावर शिवसेना नेते, माजी आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या तक्रारीची महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. त्या संबंधात नगर विकास सचिवांना अहवाल पाठवून या महानगरपालिकेवर “आयएएस ” दर्जाचा अधिकारी नेमण्यात यावा, अशी शिफारस केली असल्याचे गोटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले.
माजी आमदार गोटे यांनी १८ फेब्रुवारी २०२५ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयास पत्र दिले आहे.
या पत्राचे अनुषंगाने मागील सहा वर्षात धुळे महानगरपालिकेत राज्य शासनाच्या दृष्टीने आर्थिक शिस्तीला, धोरणात्मक निर्णयाला फाटा देऊन धुळे महानगरपालिकेत राज्य शासनाच्या तिजोरीतून आलेल्या रकमेपैकी किमान ५० टक्के रक्कम म्हणजेच ५०० ते ५५० कोटी रुपये आयुक्तांच्या सहकार्याने भ्रष्टाचाऱ्यांच्या घशात गेले आहेत असे सदर पत्रात नमुद केलेले आहे.
तसेच धुळे महानगरपालिकेच्या प्रशासक आणि आयुक्त श्रीमती अमिता दगडे पाटील यांनी सर्व कायदे, नियम, अधिकार यांचे सर्रास उल्लंघन करुन, नव्हे तर पायदळी तुडवून, हुकूमशाही पध्दतीने कारभार हाकला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतांनाही त्याकडे दुर्लक्ष करुन, बेकायदेशीरपणे मागील दाराने नोकर भरती करणे, महानगरपालिकेच्या जागा स्वतःची वडोलोपार्जित संपत्ती असल्याप्रमाणे वाटप करणे, निकृष्ट दर्जाची कामे करणे, न केलेल्या कामांचे बिले अदा करणे, अशा विविध प्रकारच्या तक्रारी सदर अर्जात नमुद केलेल्या आहेत.
धुळे महानगरपालिकेत आयएएस दर्जाचा प्रामाणिक अधिकारी, आयुक्त पदावर नेमणेत यावा. तसेच सचिव दर्जाच्या एखादया प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी करणेबाबत देखील सदर अर्जात नमुद केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top