तक्रारदार जयेश दुसाणे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन
धुळे – आझादनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सावकारी प्रकरणात आरोपी राजेंद्र जिवनलाल बंब व संजय जिवनलाल बंब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून, या प्रकरणातील तक्रारदार जयेश उमाकांत दुसाणे यांनी सदर गुन्ह्यातील सरकारी वकील बदलून MPSC मार्फत नियुक्त सरकारी वकील नेमण्यात यावा, अशी मागणी करत जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात दुसाणे यांनी नमूद केले आहे की, आरोपींपैकी राजेंद्र बंब सध्या कोठडीत असून, त्याचा भाऊ संजय बंब जामिनावर आहे. मात्र, जामिनावर असलेला संजय बंब व राजेंद्र बंब यांचा मुलगा अचल बंब हे पिडीत लोकांवर दबाव आणत आहेत आणि सावकारीतून वाटप केलेल्या रकमेची मागणी करत धमकावत आहेत. तसेच, संजय बंब न्यायव्यवस्था व पोलीस यंत्रणेबाबत जनतेमध्ये चुकीचा गैरसमज पसरवत असून, “सरकारी वकील, तपास अधिकारी व न्यायाधीश आमच्या बाजूचे आहेत” असे खुलेआम बोलत आहे. याचे काही मोबाईल कॉल रेकॉर्डिंग्स पुराव्यादाखल तक्रारदाराकडे उपलब्ध असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
तसेच, सद्यस्थितीत या प्रकरणात कार्यरत असलेले सरकारी वकील अॅड. तवर यांचे आरोपी व त्यांच्या कुटुंबीयांशी आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप करत, त्यांनी याआधी बंब कडून विमा पॉलिसीही घेतल्याचे दुसाणे यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात तटस्थ आणि निष्पक्ष युक्तिवाद होणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी अॅड. तवर यांच्याऐवजी MPSC मार्फत नियुक्त सरकारी वकील नेमावा, किंवा MPSC यादीतील अॅड. जगदीश सोनवणे यांची नेमणूक करावी, अशी विनंती निवेदनात केली आहे.
हे निवेदन पालकमंत्री जयकुमार रावल यांना दिले असून, तक्रारदाराने न्यायव्यवस्थेवरील विश्वास अबाधित राहावा यासाठी तातडीने या मागणीवर कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.