बोराडी ग्रामपंचायतीला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पेंढारकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान 2023-24 अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोराडी ग्रामपंचायतीने बाजी मारली असून ग्रामपंचायत गटात राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे.
मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे नागरी सेवा दिनानिमित्त पार पडलेल्या पुरस्कार वितरण समारंभात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पेंढारकर यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी कौशल्य, रोजगार व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, यशदाचे अतिरिक्त महासंचालक राहुल रंजन महिवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार समारंभात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सरपंच सुखदेव भिल, उपसरपंच राहुल रंधे यांचाही गौरव करण्यात आला.
बोराडी ग्रामपंचायतीने गावातील पडीक जमिनींना हरीत क्षेत्रामध्ये रूपांतरित करून पर्यटकांना आकर्षित केले. यामुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढले आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. विविध विकासात्मक उपक्रम राबवून बोराडी ग्रामपंचायतीने प्रशासनात गतिमानता आणि नवचैतन्याचे उत्तम उदाहरण सादर केले आहे.
ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पेंढारकर यांनी सांगितले की, “या पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली असून आगामी काळात अधिक जोमाने काम करण्यास प्रेरणा मिळाली आहे.” त्यांनी यशाचे श्रेय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, शिरपूरचे गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांच्याही मार्गदर्शनाला दिले.
या यशाबद्दल पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, तसेच जिपचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी पेंढारकर व ग्रामपंचायत पथकाचे अभिनंदन केले आहे.
