मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेअंतर्गत ८०० नागरिक घेणार रामल्लाचे दर्शन

पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते धुळे रेल्वे स्थानकावर होणार शुभारंभ

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील निवड झालेल्या 800 ज्येष्ठ नागरिकांची अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी विशेष रेल्वेने तीर्थयात्रा 26 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचा शुभारंभ धुळे रेल्वे स्थानकावर सकाळी 11 वाजता, राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार आहे. ही माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा उद्देश 60 वर्षांवरील सर्वधर्मीय ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेची मोफत संधी उपलब्ध करून देणे आहे. 26 ते 30 एप्रिलदरम्यान या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, या काळात लाभार्थ्यांना विशेष रेल्वेने अयोध्येच्या पवित्र भूमीत श्रीराम मंदिराचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.

यात्रेच्या आयोजनासाठी जिल्ह्यातील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून, यात्रेच्या पूर्वसंध्येला लाभार्थ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे.

प्रवासासाठी लाभार्थ्यांनी लक्षात ठेवावयाच्या सूचना:

  • प्रस्तावित वेळ : 26 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता धुळे रेल्वे स्थानकावर उपस्थित राहावे.
  • कागदपत्रे : मूळ आधारकार्ड, अलीकडील दोन रंगीत पासपोर्ट साइज फोटो, आणि शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे 15 दिवसांपेक्षा जुने नसलेले वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र अनिवार्य.
  • सोयी : प्रवास कालावधीत चहा, नाश्ता, भोजन व निवासाची मोफत सुविधा राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक पर्यटनाची संधी मिळत असून, त्यांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनात समृद्धी आणण्याच्या दृष्टीने ही एक स्तुत्य पाऊल आहे, असे विशेष अधिकारी (शानिशा) संजय सैंदाणे यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top