शिवसेना नेते, माजी आमदार अनिल गोटे यांची मागणी
धुळे – बोगस शिक्षक भरती व शिक्षण क्षेत्रातील अधिकारी यांना हाताशी धरून, संस्था चालकांनी घातलेला हैदोस, संबंध महाराष्ट्राने पाहिलेला आहे. शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना माझे जाहीर आवाहन आहे. अशा नकली चौकशांचे नाटक बंद करा ! दोषी व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करा, अशी मागणी शिवसेना नेते, माजी आमदार अनिल गोटे यांची मागणी यांनी केली आहे. राज्य शासन या मुद्यांवर खरोखरच गंभीर आहे, याचा प्रत्यय आम जनतेला येणे आवश्यक असल्याचेही गोटे यांनी नमूद केले आहे.
गोटे यांनी पत्रकात म्हटले आहे की, राज्य शासनाची अवस्था “कोंबडा आरवतो खूप, पण अंडी काही देत नाही” अशी झाली आहे. धुळे जिल्ह्यात या बोगस शिक्षक भरती व शैक्षणिक वर्गांना मान्यता यांचा अक्षरशः नंगानाच झालेला आहे. अपंगांच्या शाळेला मान्यता देऊन भ्रष्टाचार करणाऱ्यांची थोडे थोडके नव्हे तर किमान १२०० कोटी रुपये पचवले आहेत. याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. माझ्या तक्रारीची चौकशी झाली. माझ्या तक्रारीच्या तपासात मी केलेले आरोप सिद्ध झाले, आश्चर्य असे की ज्यांच्या विरुद्ध मी तक्रार केली ते आज भाजपामध्ये पदाधिकारी आहेत.
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करतांना अजिबात हयगय केली नाही. शिक्षकांच्या नियुक्तीला मान्यता देताना अक्षरशः बोगस प्रकरणे तयार करून, जुन्या तारखा दाखवून (बॅक डेटेड) मान्यता दिल्याची शेकडो प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत. खरोखरच प्रामाणिकपणे चौकशी केली तर, कुठल्याही दबावाला बळी पडले नाहीत तर, किमान दोन हजार कोटी रुपयांचा तरी गैर व्यवहार, भ्रष्टाचार उघड झाल्याशिवाय राहणार नाही, असा आरोपही माजी आमदार अनिल यांनी केला आहे.