धुळ्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने केला जम्मू-काश्मीरमधील हत्याकांडाचा तीव्र निषेध

धुळे: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील निर्दोष नागरिकांवर केलेल्या हत्याकांडाची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ने तीव्र शब्दांत निंदा केली आहे. धर्म विचारून निर्दोष नागरिकांची गोळ्या घालून हत्या करणे अत्यंत दुःखद आणि घृणास्पद कृत्य आहे, असे अभाविपने म्हटले आहे. या घटनेमुळे देशभरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाची लाट निर्माण झाली आहे. अभाविपने या दहशतवादी कृत्याचा आणि कट्टरपंथी हिंसाचाराचा कठोर निषेध केला आहे.

२३ एप्रिल २०२५ रोजी, अभाविपच्या धुळे शाखेच्या वतीने गांधी पुतळा येथे या घटनेच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी अभाविपच्या देवगिरी प्रदेश मंत्री कु. वैभवी ढिवरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य लहानू कोळेकर, शहर सहमंत्री योगेश कोळवले आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी निषेध फलक घेतले आणि घोषणाबाजी करत या दहशतवादी कृत्याच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला. अभाविपने आपल्या मागणीत स्पष्ट केले आहे की, या हत्याकांडातील दोषींना त्वरित अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी. तसेच जम्मू-काश्मीरमधील नागरिकांच्या सुरक्षेची आणि संरक्षणाची व्यवस्था अधिक मजबूत करावी. केंद्र सरकारने या गंभीर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, ज्यामुळे भविष्यात अशा घटनांना पायबंद घालता येईल आणि समाजात द्वेष व भीती निर्माण करणाऱ्या कट्टरपंथी विचारांना समूळ नष्ट करण्यासाठी कठोर पाऊले उचलावीत.

अभाविप नेहमीच देशाच्या एकतेसाठी, अखंडतेसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी लढत आलेली आहे. अभाविप या दुःखद प्रसंगी मृत नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होण्याची भावना व्यक्त करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top