धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या आंबापाडा गावात ३० सप्टेंबर २०२१ रोजी घडलेल्या खून प्रकरणात आरोपी गुलाब बंडू बागुल यास धुळे सत्र न्यायालयाने जन्मठेपेची व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
या प्रकरणात मयत सुमनबाई बंडू बागुल यांच्या मुलाने, म्हणजेच आरोपी गुलाब बागुल याने दारूसाठी आईकडे पैसे मागितले. मात्र तिने पैसे नाकारल्याने रागाच्या भरात त्याने हाता-बुक्क्यांनी मारहाण केली आणि तिचे डोके भिंतीवर व जमिनीवर आपटून खून केला. ही घटना सायंकाळी साडेसातच्या सुमारास मयत महिलेच्या राहत्या घरी घडली होती.
या प्रकरणी फिर्याद चुनीलाल तानाजी बागुल यांनी दिली होती. पिंपळनेर पोलीस स्टेशनने गुन्हा CR No. 231/2021 नोंदवून तपास सुरु केला. आरोपीवर IPC 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी म्हणून PSI सचिन शालिकराव साळुंखे यांनी काम पाहिले. सरकारी पक्षातर्फे पराग पाटील यांनी युक्तिवाद केला.
अखेर न्यायालयाने आरोपी गुलाब बागुल याच्यावर दोष निश्चित करत IPC 302 अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा जाहीर केली. या निर्णयामुळे न्यायालयीन यंत्रणेकडून घटनेतील मयत महिलेला न्याय मिळाल्याचे चित्र आहे.
