धुळे जिल्ह्यातील खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. धुळे जिल्हा क्रीडा संकुलात विविध नवीन सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी १६ कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आली आहे. याबरोबरच अपर तहसील कार्यालयांच्या ठिकाणीही नवे क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ही बैठक जिल्हा क्रीडा संकुल कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, शिक्षणाधिकारी मनिष पवार, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, समाजकल्याण अधिकारी नितीन खंडेराय,उपकार्यकारी अभियंता झाल्टे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, समिती सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री जयकुमार रावल यांनी बैठकीत स्पष्टपणे निर्देश दिले की, जिल्ह्यातील अपर तहसीलदार कार्यक्षेत्रात नवीन क्रीडा संकुल उभारण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी त्वरीत राज्याच्या क्रीडा विभागाकडे प्रस्ताव सादर करावा. महसूल विभागाने या क्रीडा संकुलासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी. ते पुढे म्हणाले, “आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात नियमितपणे सात दिवसांचे विविध खेळांचे प्रशिक्षण सत्र आयोजित करावे. त्यासाठी तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षक व एक संघटना समिती स्थापन केली जावी. जलतरण तलावात लाईफ गार्ड व तज्ज्ञ प्रशिक्षक नियुक्त करणे अत्यावश्यक आहे. सर्व नवीन कामे दर्जेदार व्हावीत, याकडे विशेष लक्ष द्यावे.”
त्यांनी महत्त्वाच्या सूचनाही दिल्या की, क्रीडा संकुलात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था महापालिकेने तातडीने करावी, सोलर युनिट व सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, तसेच गरुड मैदान क्रीडा संकुलात लिफ्टची सोय करावी. क्रीडा संकुलातील गाळे धारकांच्या प्रश्नांचेही समाधान शोधण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीत क्रीडा संकुलाच्या सुधारित प्रशासकीय मान्यता, भौतिक सुविधा, कर्मचारी मानधन वाढ, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, गाळेधारकांचा करारनामा, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात फर्निचर व इतर आवश्यक सुविधा संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आले. धुळे जिल्ह्यातील क्रीडा संस्कृती बळकट करण्यासाठी आणि नवोदित खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकवण्यासाठी या निर्णयांनी नक्कीच नवा मार्ग तयार होईल. या सकारात्मक पावलांमुळे जिल्ह्यातील क्रीडाक्षेत्रात एक नवे पर्व सुरू होणार आहे.
