महात्मा जोतीराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे वरिष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात मंगळवारी सकाळी गिरणा नदीवरील बांभोरी पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे दोन्ही बाजूंना मोटारींच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. दरम्यान, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदेंसह प्रमुख नेत्यांना स्थानबद्ध केल्यानंतर शहरातील आकाशवाणी चौकातही ठाकरे गटातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलन सुरू होण्यापूर्वीच लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्यासह इतर आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन धांडे यांनी दिली. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधासाठी बांभोरी पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, तत्पूर्वीच प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे मोजक्या पदाधिकार्यांनी बांभोरी पूल गाठत आंदोलनाची तयारी केली. पुलावरच आंदोलकांनी झोपत महामार्ग रोखून धरला.याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी रमेश पाटील यांनी प्रशासन हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. आंदोलनकर्त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील व महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.