प्रभाग क्रमांक १५ मधील अशोक नगर जलकुंभाच्या उभारणीचे काम तब्बल सात ते आठ महिन्यांपासून रखडले आहे. ठेकेदाराच्या आडमुठ्या भूमिकेमुळे जलकुंभाचे काम थांबले असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त सौ. अमिता दगडे-पाटील यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात शिवसेनेने महानगरपालिकेला निवेदन देऊन अशोक नगर जलकुंभाची जीर्णावस्था लक्षात घेता तो जमीनदोस्त करून नव्याने जलकुंभ उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार, जल मिशन योजनेअंतर्गत जलकुंभ पाडण्यात आला आणि सहा महिन्यांत नवीन जलकुंभ उभारण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले होते.
मात्र, प्रत्यक्षात ठेकेदाराने कामाची सुरुवात करून वर्तुळाकार मोठा खड्डा खणल्यानंतर काम थांबले आहे. मागील सात ते आठ महिन्यांपासून कोणतीही प्रगती न झाल्याने जलकुंभ उभारणीला किमान आणखी दोन ते तीन वर्षे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रलंबित कामामुळे प्रभाग १५ मधील नामा चाळ, सिद्धार्थ नगर, नवजीवन नगर, अशोक नगर, एलआयसी कॉलनी, सुशील नगर, सम्राट नगर, भावसार कॉलनी, गोपाळ नगर, जमनागिरी भिलाटी आदी भागातील पाणीपुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. सध्या हनुमान टेकडी मेन लाईनद्वारे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, अनेक ठिकाणी पाच दिवसांवरून पाणी मिळत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
या परिस्थितीमुळे आज शिवसेना महानगरप्रमुख धीरज पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख भरत मोरे, शहर समन्वयक संदीप सूर्यवंशी, विनोद जगताप, कपिल लिंगायत, अरुण पाटील, योगेश पाटील आणि मयूर रवंदळे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात त्यांनी ठेकेदाराच्या कामातील अक्षम्य दिरंगाईचा निषेध करत, त्याच्यावर कारवाई करावी व नवीन निविदा काढून जलकुंभाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी केली आहे.
शहरातील वाढत्या उन्हाळ्यात पाण्याची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याने आता प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी स्थानिकांचीही मागणी आहे.