साक्री : दातरती, वाजदरे आणि बळसाणे शिवारात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर महसूल विभागाने शनिवारी कारवाई केली. तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कार्यवाही केली.
जिल्हाधिकारी धुळे यांच्या निर्देशानुसार तालुक्यात अवैध गुणखनिज वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. या पथकाचे नेतृत्व साखरी तहसीलचे नायब तहसीलदार चंद्रकांत शिंपी करत आहेत. शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पांझरा नदीपात्रात दातरती मौजेत अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर छापा टाकण्यात आला. ट्रॅक्टर जप्त करून साक्री तहसील कार्यालयात आणण्यात आले. त्याच दिवशी वाजदरे आणि बळसाणे शिवारातही अशाच प्रकारची कारवाई करत आणखी दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. एकूण तीन ट्रॅक्टर सध्या साक्री तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत.
या कारवाईत नायब तहसीलदार चंद्रकांत शिंपी, मंडळ अधिकारी निजामपूर वळसाणे, ग्राम महसूल अधिकारी आणि कोतवाल यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, साक्री तालुक्यात कुठेही अवैध गुणखनिज वाहतूक अथवा उत्खनन होत असल्यास नागरिकांनी तातडीने तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी केले आहे.
साक्री प्रतिनिधी – निलेश सावळे