‘बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञे’ द्वारे जनजागृती करावी

सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेतर्फे मीना भोसले यांचे आवाहन

धुळे : ‘अक्षयतृतीये’च्या मुहूर्तावर होणारे बालविवाह थांबविण्यासाठी ब्राह्मण, भटजी, मौलवी, धर्मगुरू यांच्यासोबत बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेणार आहोत. या घटकांनी ‘बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा’ घेऊन जनजागृती करावी, असे आवाहन शहरातील सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मीना भोसले यांनी सोमवारी 28 एप्रिलला साक्री रोडवरील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी संस्थेचे प्रकल्प समन्वयक प्रेम वाकळे, टीम मेंबर अलका थोरात व सत्यम भोसले उपस्थित होते.
श्रीमती भोसले म्हणाल्या, की ‘अ‍ॅक्सेस टू जस्टीस’ या कार्यक्रमांतर्गत ‘बालविवाहमुक्त भारत’ हा प्रकल्प धुळे जिल्ह्यात सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्था राबवित आहे. राज्यात अक्षयतृतीया मुहूर्तावर विविध ठिकाणी बालविवाह होताना दिसून येतात. विविध धार्मिक मंदिरांमध्येदेखील बालविवाह होतात. विवाह कोणत्याही धर्माचा असो तो विवाह पार पाडण्यासाठी ब्राह्मण, पंडित, धर्मगुरू, मौलवी यांचा सहभाग असतो. ‘बालविवाह प्रतिबंध कायदा’ हा असा धार्मिक विधी करणार्‍या ब्राह्मण, मौलवी, धर्मगुरू यांना माहिती व्हावा, जेणेकरून होणारे बालविवाह त्यांच्यामार्फत थांबविण्यात यावे. ‘बालविवाह प्रतिबंध कायदा’ (अधिनियम) 2006 नुसार
बालविवाह घडवून आणणे अपराध आहे. ज्या ठिकाणी बालविवाह घडून येत आहेत, तेथील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलिसपाटील, तसेच मुलांचे आई-वडील, ब्राह्मण, वर्‍हाडी, मंडपवाले, घोडेवाले, बँडवाले, फोटोग्राफर आदी सगळ्यांवरच गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणून बालविवाह प्रतिबंध कायद्याची माहिती संपूर्ण जिल्ह्याला व्हावी. त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. बालविवाह होत असेल तर त्याची तक्रार 1098 चाइल्ड हेल्पलाइनकडे करावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. तसेच बालविवाहाची तक्रार गावाचे पोलिसपाटील, संबंधित पोलिस स्टेशन, महिला व बालविकास विभाग, बाल संरक्षण कक्ष तसेच बालविवाहासाठी काम करणार्‍या सामाजिक संस्थांकडेदेखील करता येऊ शकते.
बालविवाह थांबविण्यास यंत्रणेला जर मुलाच्या आणि मुलीच्या परिवाराने सहकार्य केले तर बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार बालविवाह थांबविला जातो व गुन्हा दाखल होत नाही. बालविवाह प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी आणि 2030 पर्यंत भारत देश ‘बालविवाहमुक्त’ व्हावा, यासाठी नेहमीच कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह थांबविण्यासाठी आपण ब्राह्मण, भटजी, मौलवी, धर्मगुरू यांच्यासोबत बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेणार आहोत, नंतर मंदिराच्या आवारात किंवा बाहेरच्या भिंतींवर बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या वॉल पेंटिंग करणार आहोत. हा उपक्रम संपूर्ण धुळे जिल्ह्यात अक्षयतृतीया आणि नंतर पंधरवाड्यात राबविण्यात येईल. या उपक्रमात महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन, बाल कल्याण समिती, पोलिस अधीक्षक, बाल पोलिस पथक, पोलिस उपनिरीक्षक, ग्रामसेवक, तलाठी, पोलिसपाटील, अंगणवाडीसेविका, ग्राम बालसंरक्षण समिती यांचादेखील सहभाग असेल, श्रीमती भोसले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top