महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या जमीन घोटाळा आरोप प्रकरणावरून आज विधानसभेत विरोधक विरूद्ध सत्ताधारी असा सामना पाहण्यास मिळाला. आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंड अल्प दरात दिल्याचे आरोप झाले. त्यावरून राडा झाला तर २५ डिसेंबरला म्हणजेच रविवारी अब्दुल सत्तारांचं प्रकरण समोर आलं. यावरून विरोधक विरूद्ध सत्ताधारी असा जोरदार सामना पाहण्यास मिळाला.
विधानसभेत जोरदार घोषणाबाजी
विधानसभेत कामकाज सुरू असताना जेव्हा अब्दुल सत्तार यांचा विषय निघाला आणि ते जमिनीचं प्रकरण समोर आलं त्यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. भूखंड खा कुणी श्रीखंड खा!, गद्दार बोलो सत्तार बोलो अशा घोषणा देत आणि गाणी म्हणत विरोधी बाकांवरच्या आमदारांनी आपला रोष व्यक्त केला. अजित पवार बोलायला उभे राहिले होते तेव्हा, पृथ्वीराज चव्हाण बोलत होते तेव्हा आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्याला उत्तर देत होते तेव्हाही ही घोषणाबाजी सुरू होती.
अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप झालेलं प्रकरण नेमकं काय?
वाशिम जिल्ह्यातील गायरान जमिनीचं प्रकरण अनेक वर्षांपासून कोर्टात आहे. या प्रकरणात योगेश खंडारे यांनी ३७ एकर जमिनीचा ताबा मिळावा म्हणून मागणी केली आहे. पण स्थानिक दिवाणी न्यायालयासह जिल्हा कोर्टाने त्यांची मागणी फेटाळली. जिल्हा कोर्टाने १९ एप्रिल १९९४ ला खंडारे यांची मागणी फेटाळली. जमिनीवर खंडारे यांचा कोणताच अधिकार नाही तरीही ते ताबा घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं कोर्टाने म्हटलं, तसंच यातून सरकारी जमीन बळकावण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट होतो असंही दिसत असल्याचं कोर्टाने म्हटलं.
पंजाब सरकार विरूद्ध जगपाल सिंग प्रकरणात कोर्टाने सार्वजनिक उपयोगाची जमीन कोणालाही व्यक्तीशः देता येत नाही असा निकाल दिला होता. याच आदेशाचा आधार घेत राज्य सरकारने १२ जुलै २०२१ ला म्हणजेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शासन आदेश काढला होता. मात्र राज्यात जे सत्तांतर २१ जूनला झालं त्याच्या अवघ्या चार दिवस आधी म्हणजेच १७ जूनला अब्दुल सत्तार यांनी ३७ एकर गायरान जमीन योगेश खंडारे या व्यक्तीला देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतना सगळ्या कायदेशीर नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप आहे.