जळगाव : भरधाव कंटेनरने धडक दिल्याने गाडीतून प्रवास करणारे दोघे जण ठार झाले, तर एक जण जखमी झाला आहे. जळगाव जिल्ह्यात पारोळा तालुक्यातील हा भीषण अपघात झाला. मयतामध्ये पारोळा नगरपालिकेचे अभियंता कुणाल देविदास सौपुरे आणि डॉ. निलेश भीमराव मंगळे यांचा समावेश आहे. तर संदीप आनंदा पवार हे जखमी झाले आहेत.
पारोळा शहरातील कुणाल सौपुरे, डॉ. निलेश मंगळे व संदीप पवार हे तिघेही मित्र आहेत. शनिवार, रविवार सुट्टी असल्याने कुणाल सौपुरे यांच्यासह त्यांचे दोघेही मित्र कारने मुंबई येथे गेले होते. परतीचा प्रवास करत असताना पारोळ्यापासून काही अंतरावर त्यांच्या कारला भरधाव असलेल्या एका गॅस कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेत कार चालक कुणाल सौपूरे व डॉ. निलेश मंगळे यांचा कारमध्ये दबल्या जाऊन जागेच मृत्यू झाला तर संदीप पवार हे जखमी झाले आहेत. घटने नंतर कंटेनर रस्ता लागत उभा करून चालक फरार झाला होता.