यावल : तालुक्यातील फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचार्यांनी थकीत वेतन मिळण्यासह कारखाना विक्री प्रकरणातील संशयकल्लोळ दूर करण्याच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी अंकलेश्वर- बर्हाणपूर महामार्ग रोखून रोष व्यक्त केला. आंदोलनस्थळी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांनी भेट दिली. त्यावेळी कर्मचार्यांनी घोषणाबाजी करीत अध्यक्षांना घेराव घातला.
यावल येथील सहकारी साखर कारखाना थकीत कर्जापोटी जिल्हा बँकेच्या ताब्यात होता. त्याची ६३ कोटींना विक्री करण्यात आली आहे. या विक्री प्रक्रियेवर जिल्हा बँक संचालक मंडळाच्या बैठकीतही एकमताने मंजुरी देण्यात आली होती. यामुळे बँकेचा तोटा कमी होऊन नफ्याकडे वाटचाल करणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी म्हटले होते. जिल्हा बँकेने थकीत कर्जापोटी बँक सिक्युरटायझेशन नियमांतर्गत मधुकर कारखान्याची विक्री केली असून, नवीन मालकाकडून कारखाना यंदाच्या हंगामात सुरू करण्यात आला आहे. नवीन मालकांनी थकीत देणी देण्यास नकार दिल्याने कर्मचार्यांनी दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे.बुधवारी कर्मचार्यांनी अंकलेश्वर-बर्हाणपूर महामार्ग रोखून धरला. जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात खासदार रक्षा खडसे, अमोल जावळे, शरद महाजन, नरेंद्र नारखेडे आदींसह परिसरातील लोकप्रतिनिधींनीही सहभाग नोंदविला.