नवी दिल्ली: टीम इंडियाचा आघाडीचा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत याच्या गाडीचा शुक्रवारी पहाटे पाच वाजता रुरकी येथे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातामध्ये पंत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उत्तराखंडमधील देहरादून येथे मॅक्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आईला सरप्राईज देण्यासाठी ऋषभ पंत हा दिल्लीहून रुरकीला निघाला होता. गेल्या काही दिवसांपासून ऋषभची आई त्याला घरी बोलवत होती. त्यामुळे आईला सरप्राईज देण्यासाठी ऋषभ पंत भल्या पहाटे उत्तराखंडला निघाला होता. याठिकाणी नववर्षाचे सेलिब्रेशन करण्याचा ऋषभचा प्लॅन होता. मात्र, घरी पोहोचण्यापूर्वीच रुरकी येथील नारसन बॉर्डरवर ऋषभची मर्सिडीज कार वेगात असताना दुभाजकावर जाऊन आदळली. यावेळी ऋषभ पंत गाडीत एकटाच होता. गाडी दुभाजकाला वेगाने धडकल्यानंतर कारने लगेच पेट घेतला. त्याच्या मर्सिडीज कारचा पुढचा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे ऋषभ पंत जखमी अवस्थेतही प्रसंगावधान राखत विंडस्क्रीन तोडून गाडीबाहेर पडला. त्यामुळे ऋषभ पंतचा जीव थोडक्यात बचावला.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी ऋषभ पंतच्या प्रकृतीची माहिती डॉक्टरांकडून घेतली आहे. ऋषभ पंत याच्यावरील उपचाराचा संपूर्ण खर्च उत्तराखंड सरकारकडून केला जाणार आहे. ऋषभ पंतच्या प्रकृतीविषयी आता रुग्णालय प्रशासनाकडून कधी माहिती देण्यात येणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
ऋषभ पंतच्या अपघाताची बातमी मिळताच त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. ऋषभची आई सरोज या तातडीने देहरादून येथील रुग्णालयात पोहोचल्या. मुलाला जखमी पाहून सरोज यांना रडू कोसळले. सध्या डॉक्टरांकडून ऋषभवर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र, ऋषभ पंतच्या हातापायाला आणि डोक्याला जबर मार बसला आहे. त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसांमध्ये ऋषभ पंतला उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात येऊ शकते.