नाशिक : शहरातील एका स्विफ्ट डिझायर मोटारीने प्रथम दुचाकी, नंतर टाटा नेक्सन वाहनास धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. अपघातग्रस्त स्विफ्ट मोटारीत दोन पिशव्या भरून ५०० आणि दोन हजार रुपयांसारख्या हुबेहुब दिसणाऱ्या नोटा आढळल्या. त्यावर केवळ शालेय प्रकल्पांसाठी वापर आणि चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाचा उल्लेख असून त्या लहान मुलांच्या खेळण्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. या नोटा बाळगणाऱ्या वाहनाचा चालक मद्यपान केलेला होता. त्याच्याविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी या नोटांचे रहस्य उलगडण्याच्या दिशेने तपास सुरु केला आहे. तक्रारदार ज्ञानेश्वर हे मित्र सोमनाथ याच्या समवेत टाटा नेक्सन मोटारीने सिटी सेंटर मॉलकडून त्रिमूर्ती चौकाकडे जात होते. यावेळी अंबडकडून भरधाव येणाऱ्या स्विफ्ट डिझायरने दुचाकीस्वारास धडक देऊन जखमी केले. त्यानंतर वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने टाटा नेक्सनला पाठीमागून धडक दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अपघातात दुचाकीचालक अमोल जखमी झाला. दुचाकी आणि टाटा नेक्सनचे या दोघ हि वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातामुळे परिसरात काही वेळ गोंधळ उडाला. नागरिकांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली.
स्विफ्ट मोटारीचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुध्द वाहनाचे नुकसान व व्यक्तिगत सुरक्षेला धोका निर्माण केल्यावरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.