पिंपरी : औंधमधील चव्हाणनगर येथील ग्रामीण पोलिस मुख्यालयाची ४ हेक्टर हून अधिक जागेत हिंजवडी मेट्रोसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला मिळाली आहे. या बदल्यात ‘पीएमआरडीए’कडून ग्रामीण पोलिसांना ३९७ घरे बांधून दिली जाणार आहेत. या घरांसाठी एकूण शंभर कोटी रुपये खर्च येणार असून, लवरकच बांधणी कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
‘पीएमआरडीए’कडून सार्वजनिक खासगी भागिदारी तत्त्वावर हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यासाठी ‘पीएमआरडीए’ला पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालयातील जागा मिळाली आहे. या जागेबरोबरच ‘पॉलिटेक्निक कॉलेज’ची जागा मिलविण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या जागेवर न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे पर्यायी तीन जागांचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. तसेच वाकडेवाडी येथील डेअरीची ७. हेक्टर जागाही ‘पीएमआरडीए’ ला मिळाली आहे. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली जागा ‘पीएमआरडीए’च्या हातात आल्याने त्यांच्या मागणीनुसार ‘पीएमआरडीए’कडून पोलिसांना घरे उभारून देणार आहे. सध्या या ठिकाणी पुणे ग्रामीण पोलिसांसाठी घरे आहेत. त्यामुळे मुख्यालय आणि बावधन येथील पोलिसांच्या जागेत ही घरे उभारून देण्यात य़ेणार आहेत.