पुणे : एका ने स्वत: ला पेटवून घेतल्याचा प्रकार घडला. मात्र पोलीस ठाण्यात जाऊन पत्नीने मला पेटवून दिल्याचा आरोप केला. लखन काळे असे तरुणाचं नाव आहे. त्यानंतर पोलिसांनी लखन याच्या पत्नीसह सासू, सासरे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. परंतु तपासात जखमीने स्वतःलाच पेटवून घेऊन सासू आणि सासऱ्यावर आरोप केल्याचं स्पष्ट झालं आहे. ही घटना ३० डिसेंबर रोजी चंदननगरच्या मुख्य बाजारपेठेत संध्याकाळच्या सुमारास घडली असून या घटनेत सदर तरुण गंभीर जखमी झाला. एका झोपडीतून आग बाहेर येताना पाहून परिसरातील व्यापारीही घाबरले. त्यानंतर ही सदर घटना उघड झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लखन हा मूळ शिरूरमधील रहिवासी आहे. कामानिमित्त तो आणि त्याची पत्नी पुण्यातल्या चंदननगरच्या फुटपाथवरील झोपडीत राहतात. काही वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. मात्र पती आणि पत्नीमध्ये सतत वाद होत असायचे. त्यामुळे पत्नीने आपल्या आई-वडिलांना बोलावून लखनला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या दिवशी लखनने स्वत:लाच पेटवून दिलं आणि पत्नीने आपल्या आई-वडिलांच्या मदतीने मला पेट्रोल टाकून जाळून दिलं, अशी फिर्याद पोलीस ठाण्यात दिली होती. परंतु पोलिसांनी अधिक तपास केला असता लखनने स्वत: पेटवून घेतल्याचं स्पष्ट झालं.