नाशिक : जिल्ह्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेची चौकशी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे.
मुंढेगाव येथे सुमारे जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत रविवारी लागलेल्या आगीत दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले. त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून स्थिर आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत उच्च स्तरीय समितीद्वारे या घटनेची चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केले.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात अधिकाऱ्यांची चर्चा झाली. नाशिकच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात समिती नेमून या समितीमार्फत या घटनेची चौकशी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी घेतला आहे. त्यामूळे अपर जिल्हाधिकारी पारधे यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून चौकशी केली जाणार आहे.