नाशिक : पिंपरी-चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली. ते ५९ वर्षांचे होते. लक्ष्मण जगताप हे लढवय्ये नेते होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना आजाराने गाठलं होत. आज अखेर त्यांच उपचारादरम्यान निधन झालं.
पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करण्यापासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली होती. मनपाचे महापौरपदही त्यांनी भूषविले होते. तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही लक्ष्मण जगताप यांना श्रध्दांजली वाहिली . “चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तळमळीने काम केले. राजकीय, सामाजिक जीवनात त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विधीमंडळात मांडणारा धडाडीचा लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान होते. अशा शद्बात अजित पवार यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. , “गेले अनेक वर्ष लक्ष्मण जगताप यांच्यावर उपचार सुरु होते. दिर्घ आजाराने आज सकाळी त्यांचे दुःखद निधन झाले आहे. भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ते कार्यरत होते. पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांची लोकप्रियता होती.