जळगाव : केळीची झाडे कापून फेकणारी टोळी सक्रिय,शेतकरी चिंतेत

जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल तालुक्यात ऐन कापणीला आलेले केळीची झाडे रात्रीच्या वेळी कापून फेकली जात आहे. गेल्या आठवड्यात रावेर येथून जवळच असलेल्या वडगांव शिवारात शेतकरी दगडू उखर्डु पाटील, डॉ. मनोहर नारायण पाटील, पंकज नारखेडे यांच्या शेतातील सुमारे चार हजार केळीचे खोडे रात्रीच्या वेळेस कापून फेकली. यामुळे या शेतकर्‍यांचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ संतप्त शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन देखील केले. या ठिकाणी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन, आमदार शिरिष चौधरी यांनी भेट देवून गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र अजूनही आरोपी सापडलेले नाहीत. जिल्ह्यात या आधीही अशा घटना घडल्या आहेत.
राज्यभरात केळीचे सर्वाधिक ६३ टक्के उत्पादन घेण्यात जळगाव जिल्हा आघाडीवर आहे. केळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण, मुबलक पाणी असल्याने रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, भडगाव तालुक्यात केळीचे मोठ्या प्रमाणांत उत्पादन घेतले जाते. असे असले तरी जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांचे प्रश्न व समस्या वर्षानुवर्षेेे जैसे थे च आहेत. आधी नैसर्गिक संकटांची मालिका सुरु होती. त्यानंतर दरातील चढ-उतार व आता या संपूर्ण केळीची बाग कापून फेकून देणार्‍या माथेफिरुंमुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी भयभीत झाला आहे.
त्यासंदर्भात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी चौकशी करून शेतकर्यांच्या केळीचे नुकसान करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची सूचना केली. तसेच शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. पोलीस अधीक्षक एस.राजकुमार यांनीही या परिसरात ग्रामरक्षक दल स्थापना करण्यात येईल. तसेच अशा गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्यात येऊन त्यांचा लवकरच शोध घेण्यात येईल, असे शेतकर्‍यांना आश्वासित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares