पवई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षकाचा मध्य रेल्वेवरील कळवा रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून पडून शुक्रवारी मृत्यू झाला. ठाणे रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मनोज भोसले (५७) असे मृत पोलिसाचे नाव आहे.
कळवा रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर शुक्रवारी रात्री ९.२० च्या सुमारास लोकलमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानकातील कर्मचाऱ्यांना मिळाली. तात्काळ त्यांनी या घटनेची माहिती ठाणे रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी केलेल्या तपासात मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या पाकिटात मनोज भोसले नाव असलेले ओळखपत्र सापडले. या ओळखपत्रावरून सदर प्रवासी पवई पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे पोलिसांना समजले. ठाणे रेल्वे पोलिसांनी पवई पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, तसेच भोसले यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.